बारामती तालुक्यात २५ हजारांची लाच प्रकरणी पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
बारामती/प्रतिनिधी – ( विकी आगम )
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कार्यरत असलेले पोलीस हवालदार रमेश लक्ष्मण नागतिळक (वय ४२, रा. टी. शारदानगर, माळेगाव) यांना लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB), पुणे यांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि संबंधित प्रकरणात जामीन मिळवून देण्यासाठी सहाय्य करण्याच्या मोबदल्यात नागतिळक यांनी तक्रारदार महिलेच्या मुलाकडून पैशांची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. सुरुवातीला ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद असून तडजोडीनंतर २५ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्याचे सांगण्यात आले.
तक्रारदार महिलेने याबाबत १८ जानेवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचला. त्यानुसार ३१ जानेवारी २०२६ रोजी २५ हजार रुपये स्वीकारताना नागतिळक यांना रंगेहात पकडण्यात आले.
आरोपी हवालदार नागतिळक हे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनअंतर्गत करंजेपूल आऊट पोस्ट येथे कार्यरत होते. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत कलम ७ व ७अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक अनुजा मोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा पथकात पोलीस निरीक्षक श्रीमती असावरी शेंडगे, पोलीस निरीक्षक अविनाश घरबडे यांचा सहभाग होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करत आहेत.
दरम्यान, शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून लाच मागितल्यास नागरिकांनी तडजोड न करता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




