क्राईमताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

बारामतीत पोलिसांचा धाक उरलाय का? “कालवा करू नका” एवढं सांगितलं अन् थेट डोक्यात कोयत्याने वार! दोघे गंभीर जखमी; वाहनांचीही तोडफोड!


बारामती /संपादक -(विकी आगम)

 बारामती–पाटस रोडवरील महादेव मळा परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बाहेरून येऊन परिसरात कालवा करू नका, मोठ्याने बोलू नका, येथे दहशत निर्माण करू नका, असे सांगण्यासाठी गेलेल्या नागरिकांनाच मारहाणीचा सामना करावा लागल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेत दोन जणांवर कोयत्याने वार करण्यात आल्याची माहिती असून, दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. यातील एका जखमीच्या डोक्याला तब्बल १९ टाके पडले आहेत, तर दुसऱ्या जखमीच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर परिसरातील वाहनांचीही तोडफोड करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे महादेव मळा परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेत कोयत्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही नागरिकांना उपचारासाठी बारामती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बारामतीत नेमकं चाललंय तरी काय?

आपल्या परिसरात शांतता राखा, मोठ्याने बोलू नका, कालवा करू नका, असे सांगणेही नागरिकांना महागात पडणार असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची?

बाहेरून येऊन स्थानिक परिसरात दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न होत असतील आणि त्याला विरोध करणाऱ्या नागरिकांवरच कोयत्याने हल्ले होत असतील, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे.

गुन्हेगारांना पोलिसांचा धाक बसणार तरी कधी?

बारामती शहर आणि परिसरात मारहाण, धारदार शस्त्रांचा वापर आणि वाहनांची तोडफोड अशा घटना समोर येत असताना पोलिस प्रशासनाकडून ठोस प्रतिबंधात्मक कारवाई होणार का? कायद्याची भीती गुन्हेगारांच्या मनात निर्माण होणार तरी कधी?

पोलिस प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी होत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, हा सर्व प्रकार चक्क उपनगराध्यक्षांच्या घराजवळच घडला! शहरातील जबाबदार लोकप्रतिनिधींच्या घराशेजारीच कोयत्याने हल्ला आणि वाहनांची तोडफोड होत असेल, तर बारामतीतील कायदा-सुव्यवस्थेचा धाक नेमका कुठे आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

बारामतीत सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहेत का? कायद्याचा धाक राहणार की गुन्हेगारांची दहशत? हा प्रश्न आता प्रत्येक बारामतीकराने विचार करण्याची वेळ आली आहे.

 


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *