४०० मीटरच्या रस्त्यावर १०० हून अधिक देशी वृक्षांची उभारली हिरवी भिंत; तरुणांच्या संकल्पातून साकारले बारामतीतील अनोखे पर्यावरण मॉडेल
बारामती/संपादक -(विकी आगम)
विकासाच्या वेगात पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देत बारामतीतील कारभारी नगरने वृक्षसंवर्धनाचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. बारामतीचे माजी नगराध्यक्ष धोंडीबा आबाजी सातव उर्फ कारभारी अण्णा यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या परिसराने केवळ वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धनाची चळवळ उभी केली आहे.
बारामती शहर हिरवाईसाठी ओळखले जाते. शहरात मोठ्या प्रमाणावर सप्तपर्णी सारख्या वृक्षांची लागवड पाहायला मिळते. मात्र कारभारी नगरने देशी वृक्षांना प्राधान्य देत पर्यावरण संवर्धनाचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. स्थानिक हवामानाला अनुरूप असलेल्या देशी वृक्षांच्या लागवडीमुळे परिसरातील जैवविविधतेलाही चालना मिळत आहे. कसबा भागातील कारभारी नगरमध्ये येथील तरुण आणि स्थानिक नागरिकांनी घेतलेल्या पुढाकारातून ४०० मीटरच्या रस्त्याच्या दुतर्फा १०० हून अधिक देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या परिसरातील ८० टक्क्यांहून अधिक वृक्ष देशी प्रजातीचे असून, ३० पेक्षा अधिक विविध जातींची झाडे येथे डौलाने उभी आहेत. वड, पिंपळ, कडुनिंब, करंज यांसारख्या देशी वृक्षांसह विविध प्रजातींची लागवड करून मिश्र वृक्षलागवड आणि घनवन पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. झाडे लावण्यापुरते मर्यादित न राहता त्यांना पाणी देणे, संरक्षण करणे आणि नियमित संगोपन करण्याचे काम येथील नागरिक सातत्याने करत आहेत. या उपक्रमात सिद्धीराज मित्र मंडळाने महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे कारभारी नगर आज हिरवाईने नटलेले दिसत आहे. स्थानिक नागरिकांनीही आपल्या जागेतील झाडांची जबाबदारी स्वीकारून पर्यावरण संवर्धनाला मोठे पाठबळ दिले आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्येही येथील उंच झाडांमुळे रस्त्यावर सावली मिळते. विकासाच्या नावाखाली झाडांना अडथळा न मानता झाडांसोबत विकास कसा साधता येतो, हे कारभारी नगरने दाखवून दिले आहे. बारामती शहरात सप्तपर्णी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड आहे. सप्तपर्णीची हिरवाई आणि सावली उपयुक्त असली तरी काही संवेदनशील नागरिकांना त्याच्या फुलांच्या तीव्र सुगंधामुळे डोकेदुखी, शिंक येणे, नाकाची जळजळ, डोळ्यांना त्रास किंवा श्वसनासंबंधी अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे भविष्यातील वृक्षलागवड करताना स्थानिक हवामान, नागरिकांचे आरोग्य आणि जैवविविधता यांचा विचार करून देशी वृक्षांना प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरत आहे. “आपला परिसर आधी पर्यावरणपूरक करायचा आणि त्यानंतरच बाहेर पर्यावरणासाठी काम करायचे,” हा संकल्प येथील तरुणांनी घेतला असून, त्यातून कारभारी नगरने बारामतीत पर्यावरण संवर्धनाची नवी ओळख निर्माण केली आहे. वृक्षारोपण करणे सोपे असते, मात्र वर्षानुवर्षे झाडांना जगवणे ही खरी पर्यावरण सेवा आहे. कारभारी नगरने ही सेवा प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




