ताज्या घडामोडीमहत्त्वाचेशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

परीक्षा गैरप्रकारांची SIT चौकशी करा; सुधीर पाटसकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


बारामती/संपादक-(विकी आगम)
देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणानंतर आता महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षा तसेच दहावी-बारावी बोर्ड परीक्षांबाबतही गंभीर शंका उपस्थित करण्यात येत आहेत. राज्यात वाढत चाललेल्या पेपरफुटी, कॉपी, बनावट उपस्थिती, संशयास्पद निकाल तसेच काही कोचिंग क्लासेस व अकॅडमींच्या संभाव्य सहभागामुळे शिक्षण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर शरद पाटसकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देत या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील अनेक विद्यार्थी दिवसभर कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची उपस्थिती ग्रामीण भागातील अथवा नव्याने सुरू करण्यात आलेल्या शाळा-महाविद्यालयांमध्ये दाखवली जाते. प्रत्यक्षात विद्यार्थी त्या शैक्षणिक संस्थांमध्ये उपस्थित राहत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही कोचिंग क्लासेसकडून “निकालाची हमी” दिली जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. अनेक अकॅडमी विद्यार्थ्यांना केवळ NEET, CET किंवा इतर प्रवेश परीक्षांपुरते शिक्षण देत असून राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मूलभूत शैक्षणिक ज्ञान कमी होत असून बोर्ड परीक्षांचे महत्त्व केवळ औपचारिकतेपुरते मर्यादित राहत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. बारामतीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अकॅडमी व कोचिंग क्लासेस वाढले असून अनेक विद्यार्थी ५० ते १०० किलोमीटर अंतरावरून येथे शिक्षणासाठी येत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही ठिकाणी निष्पक्ष परीक्षा झाल्यास उत्तीर्ण होणे कठीण असलेल्या विद्यार्थ्यांनाही “निकाल निश्चित” असल्याचे आश्वासन दिले जात असल्याने परीक्षा प्रक्रियेभोवती संघटित गैरप्रकार सुरू असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील परीक्षा गैरप्रकार, पेपरफुटी, कॉपी प्रकरणे, बनावट उपस्थिती व कोचिंग क्लासेसच्या संभाव्य सहभागाची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करावी, संबंधित अकॅडमी, कोचिंग क्लासेस, शाळा व महाविद्यालयांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी तसेच दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. “शिक्षण व्यवस्था हा समाजाचा पाया आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता आणि पवित्रता धोक्यात आली तर त्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण समाजावर होतील,” असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *