क्राईमताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

RTIच्या आडून दबावाचा खेळ? बारामतीतील कथित खंडणी प्रकरणाने खळबळ; 20 लाखांच्या मागणीचा आरोप


बारामती/संपादक -(विकी आगम)                              माहितीचा अधिकार (RTI) हा नागरिकांना शासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वासाठी मिळालेला महत्त्वाचा अधिकार आहे. मात्र, याच अधिकाराचा वापर दबाव निर्माण करण्यासाठी किंवा आर्थिक फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप झाल्यास त्याची चौकशी होणे आवश्यक ठरते. बारामतीत दाखल झालेल्या एका कथित खंडणी प्रकरणामुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे.

बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 239/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 308(2), 308(3), 351(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात गुणवडी येथील गोपाळकृष्ण हरिभाऊ हरिहर यांच्याविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात विविध शासकीय कार्यालयांमध्ये अर्ज, तक्रारी आणि पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर या प्रक्रियेचा आधार घेत दबाव निर्माण करण्यात आल्याचा, बदनामीची भीती दाखविण्यात आल्याचा आणि आर्थिक मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणे आणि सार्वजनिक जीवनात अडचणी निर्माण करण्याच्या स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच 20 लाख रुपयांची आर्थिक मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांकडून इलेक्ट्रॉनिक पुरावे, ध्वनीचित्रण, ट्रान्सक्रिप्ट, फॉरेन्सिक अहवाल, साक्षीदारांचे जबाब आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. उपलब्ध पुराव्यांची वैज्ञानिक आणि कायदेशीर पद्धतीने पडताळणी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास केवळ कथित आर्थिक मागणीपुरता मर्यादित नसून, माहिती अधिकार कायद्यांतर्गत करण्यात आलेले अर्ज, विविध शासकीय तक्रारी आणि प्रशासकीय प्रक्रियांचा वापर कोणत्या उद्देशाने करण्यात आला, याचीही चौकशी करण्यात येत आहे. RTI हा नागरिकांचा अधिकार असून त्याचा उपयोग सार्वजनिक हितासाठी आणि प्रशासनातील पारदर्शकतेसाठी होणे अपेक्षित आहे. मात्र, कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचा वापर धमकी, दबाव किंवा आर्थिक फायद्यासाठी केला जात असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. या प्रकरणात आरोपी व्यतिरिक्त इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. तसेच इतर नागरिकांकडून अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत का, याचीही पडताळणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. कायदेशीर अधिकारांचा आधार घेऊन नागरिकांना त्रास देणे, धमकावणे किंवा आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तसेच बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे करीत आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना घडल्यास निर्भयपणे माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांची गोपनीयता राखण्यात येईल.

कायद्याचा आधार घेऊन न्याय मागणे हा अधिकार आहे; मात्र कायद्याचाच आधार घेऊन दबाव निर्माण करणे किंवा आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न करणे हा गुन्हा ठरू शकतो.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *