महत्त्वाचेशहरसामाजिक

बारामतीची वाहतूक कोंडी सुटणार कधी? नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा अभाव; नागरिकांमध्ये नाराजी


बारामती/संपादक-(विकी आगम)

शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत असताना वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य बाजारपेठ, चौक आणि प्रमुख रस्त्यांवर वाहनांची गर्दी, बेशिस्त पार्किंग आणि नियमांचे खुलेआम उल्लंघन यामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.

शहरातील वन-वे नियम केवळ फलकांपुरतेच मर्यादित राहिले आहेत का? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. मेन बाजारपेठ परिसरात चारचाकी वाहने आणि रिक्षाचालकांकडून अनेकदा उलट दिशेने वाहने चालवली जात असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे वाहतूक कोंडी तर वाढत आहेच, शिवाय अपघाताचा धोका देखील निर्माण झाला आहे. नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, रस्त्यावरच दुहेरी-तिहेरी पार्किंग करणे आणि वाहतूक नियमांना केराची टोपली दाखवणे हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र नियम मोडणाऱ्यांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने बेशिस्त वाहनचालकांचे धाडस वाढत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. एकीकडे शहराचा विस्तार आणि वाहनांची संख्या वाढत असताना दुसरीकडे वाहतूक नियंत्रणासाठी ठोस उपाययोजनांचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे “बारामतीत वाहतूक नियम आहेत की फक्त कागदावर?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून वन-वे नियमांची कठोर अंमलबजावणी, बेशिस्त पार्किंगवर नियमित कारवाई आणि नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी बारामतीकरांकडून होत आहे.

नागरिकांचा सवाल — “सामान्य नागरिकांकडून नियम पाळण्याची अपेक्षा असेल, तर नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा धाकही दिसला पाहिजे!”


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *