उद्योग

बारामतीत पाटबंधारे विभागाच्या परिसरात पाण्याचा अपव्यय? १२८ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह


बारामती/संपादक-(विकी आगम)

बारामती नगर परिषदेच्या १२८ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे. काही काळापूर्वी पाणीटंचाईच्या काळात तळ्याच्या बाजूला करण्यात आलेल्या छोट्या खड्ड्यात साचणारे पाणी उचलून शहराला पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्याबाबत त्यावेळी वृत्तपत्रांमध्येही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी बारामती शहरात पाणीटंचाईमुळे अनेक भागांमध्ये दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. त्या काळात नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र आता १२८ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र परिसरातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचे चित्र समोर येत असून, एका बाजूला नागरिकांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला जात असताना दुसऱ्या बाजूला मौल्यवान पाणी वाया जात असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मात्र आता कालव्यात नियमित पाणी सुरू झाल्यानंतर तळ्याच्या पाठीमागील भागातून मोठ्या प्रमाणात पाणी सारी वड्याकडे वाहून जात असून त्याचा अपव्यय होत आहे. जलसंपदा विभाग, बारामती नगर परिषद आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने पाहणी करून पाणी वाया जाणे थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

बारामती शहरातील किती तळी फुटलेल्या अवस्थेत आहेत, त्यांची बांधकामे कोणी केली, ती कोणत्या कालावधीत झाली, त्यावेळी संबंधित अधिकारी कोण होते आणि कंत्राटदार कोण होते, याची माहिती नागरिकांसमोर जाहीर करण्यात यावी. या सर्व कामांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी.

बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन तळ्याच्या पाठीमागील परिसरातील झाडी, गवत व साचलेली घाण तात्काळ साफ करण्याच्या सूचना द्याव्यात. त्यामुळे प्रत्यक्ष किती पाणी वाया जात आहे, याचा अचूक अंदाज येईल आणि योग्य उपाययोजना करता येतील.

तसेच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री यांनीही या संपूर्ण प्रकरणात स्वतः लक्ष घालून बारामतीतील पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी करण्याचे आदेश द्यावेत. बारामतीमध्ये अनेक वर्षांपासून काही अधिकारी व कंत्राटदार सातत्याने पाणीपुरवठा संबंधित कामांमध्ये कार्यरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित नियुक्त्या, कामकाजाची पद्धत आणि प्रकल्पांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.

याशिवाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कामकाजाचीही चौकशी करून पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात. तसेच बारामती शहरातील सर्व जलशुद्धीकरण केंद्रे, जलसाठवण तळी आणि पाणीपुरवठा प्रकल्पांची सविस्तर पाहणी करून ज्या ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत आहे, त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे. त्यामुळे पाण्याची बचत, गळती रोखणे आणि पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी तातडीने प्रभावी कार्यवाही करणे गरजेचे आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *