ताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

जामदार रोडवर मृत्यूचा काउंटडाउन? वाकलेले वीज खांब, झाडांना स्पर्श करणाऱ्या तारा; नागरिकांचा संताप


बारामतीत मृत्यूचा सापळा? वाकलेले वीज खांब, झाडांना स्पर्श करणाऱ्या विद्युत तारा; जामदार रोडवरील धोकादायक स्थितीमुळे नागरिकांमध्ये भीती

बारामती/संपादक-(विकी आगम)

बारामती शहरातील जामदार रोड, इंद्रप्रस्थ फेज-२ समोरील ओव्हरहेड विद्युत वाहिनी सध्या नागरिकांच्या जीवित सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पावसाळ्यात झाडांच्या फांद्या थेट विद्युत तारांना स्पर्श करत असून, काही वीज खांबही वाकलेल्या अवस्थेत असल्याने जोरदार वादळी वाऱ्यात ते कधीही कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या परिसरात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा एकमेकांवर आपटण्याची, स्पार्किंग होण्याची किंवा तारा तुटून रस्त्यावर पडण्याची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत विजेचा प्रवाह जमिनीवर येऊन निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी घरे, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने आहेत. याच मार्गावरून दररोज शेकडो शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, बारामती-फलटण रोड परिसरात अर्धवट अवस्थेत सोडून दिलेल्या अंडरग्राऊंड वीज वाहिनीमुळे नुकतीच गंभीर दुर्घटना घडली होती. मेंढपाळ मल्हारी पडळकर यांच्या कळपाला विद्युत प्रवाहाचा धक्का बसून एक मेंढी व एक श्वान मृत्यूमुखी पडले, तर मेंढपाळ आणि त्यांचा १० वर्षीय मुलगा जखमी झाला. तसेच सिद्धेश्वर गल्लीतील फिडर बॉक्समध्ये शॉर्टसर्किट होऊन स्फोट झाल्याची घटनाही ताजी असताना जामदार रोडवरील धोकादायक स्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता “तारा ओढून घेऊ” एवढेच उत्तर मिळाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, केवळ तारा ताणणे हा उपाय नसून, भविष्यातील धोका टाळण्यासाठी संपूर्ण वीज वाहिनी अंडरग्राऊंड करणे हाच कायमस्वरूपी आणि सुरक्षित पर्याय असल्याची मागणी होत आहे. नागरिकांच्या मते, महावितरण आणि बारामती नगर परिषद यांनी संयुक्त पाहणी करून धोकादायक ठिकाणांचा तातडीने अहवाल तयार करावा., धोकादायक वाकलेल्या वीज खांबांची तपासणी आणि आवश्यक ते बदल, तसेच अंडरग्राऊंड केबलचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

दरम्यान, नागरिकांनी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे—उद्या वादळी वाऱ्यामुळे वीज खांब कोसळला, विद्युत तारा तुटल्या किंवा एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेला, तर त्याची जबाबदारी नेमकी कोण स्वीकारणार? दुर्घटना घडल्यानंतर चौकशी करण्यापेक्षा ती होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हीच प्रशासनाची खरी जबाबदारी असल्याचे नागरिकांचे मत आहे.

“दुर्घटना घडल्यानंतर हालचाल करण्यापेक्षा ती होण्यापूर्वीच धोका दूर करावा. नागरिकांच्या जीवाशी खेळ होण्याआधी प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात,” अशी तीव्र भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *