महत्त्वाचेशहरसामाजिक

पुलावर पाईपांचा अडथळा; नागरिकांना चालणेही कठीण


बारामती/संपादक-(विकी आगम)
बारामती शहरातील खंडोबा नगर परिसरातून जाणाऱ्या करा नदीवरील पुलावर सध्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून या कामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती व नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सदर पुल हा परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन वापराचा मुख्य मार्ग असून येथे लहान मुले, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. पुलालगत स्मशानभूमी असल्याने देखील या मार्गावर सतत वर्दळ असते. पिण्याच्या पाईपलाईनसाठी मोठ्या आकाराचे पाईप पुलावर व फुटपाथलगत ठेवण्यात आल्याने पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक धोकादायक बनत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरालगत महात्मा फुले चौक येथे भीषण अपघातात तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या भागातील वाहतूक व सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला असून प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. भविष्यात पाईपलाईन फुटणे, कामातील निष्काळजीपणा किंवा सुरक्षेअभावी एखादा गंभीर अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची राहणार? याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, संबंधित पाणीपुरवठा विभाग व प्रशासन यांनी स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच संबंधित विभागाने तातडीने सुरक्षित व पर्यायी मार्गाचा विचार करून काम करावे. अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आनंद जाधव यांनी दिला आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *