बारामतीत सील केलेले कत्तलखाने पुन्हा सुरू? सरकारी कत्तलखान्यावरही गंभीर आरोप; उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्याकडे निवेदन
बारामती/संपादक-(विकी आगम)
बारामती शहरातील कऱ्हा नदीपात्र परिसरात प्रशासनाने कारवाई करून सील केलेले तब्बल ८ बेकायदेशीर कत्तलखाने पुन्हा सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, यामुळे बारामती शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सील तोडून व पत्रे काढून पुन्हा गोवंशाची कत्तल सुरू असल्याचा आरोप करत आज मुंबई येथील देवगिरी येथे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. पशु कल्याण अधिकारी, महाराष्ट्र शासन शिवशंकर स्वामी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात, “प्रशासन कारवाई करते आणि काही दिवसांतच तेच कत्तलखाने पुन्हा सुरू होतात, यामागे नेमके कोणाचे आशीर्वाद आहेत?” असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला. “प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरू असलेले हे प्रकार बारामतीत कायद्याचा धाक संपल्याचे चित्र निर्माण करत आहेत,” असा आरोपही यावेळी करण्यात आला. कऱ्हा नदीपात्रात कथितपणे मोठ्या प्रमाणात रक्त, मांसाचे अवशेष व सांडपाणी सोडले जात असल्याने नदीचे अस्तित्व धोक्यात आले असून परिसरातील नागरिकांचे आरोग्यही संकटात सापडल्याचा दावा करण्यात आला. परिसरात दुर्गंधी वाढत असून लहान मुलांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच बारामतीतील शासकीय कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणावर म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल सुरू असून आवश्यक विभागीय परवानग्या, पर्यावरणीय नियम व प्रदूषण नियंत्रणाच्या अटींचे पालन होत नसल्याचाही गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. “कायद्याला पायदळी तुडवत सुरू असलेले हे प्रकार प्रशासनाला दिसत नाहीत का?” असा सवालही उपस्थित करण्यात आला. निवेदनामध्ये संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून सर्व बेकायदेशीर कत्तलखाने कायमस्वरूपी उध्वस्त करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच पर्यावरण संरक्षण कायदा, जलप्रदूषण प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याबरोबरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत तातडीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी बारामतीतील सद्यस्थिती, नागरिकांमध्ये वाढत चाललेला संताप, परिसरातील दुर्गंधी, कऱ्हा नदीचे वाढते प्रदूषण आणि सार्वजनिक आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत सविस्तर माहिती आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्यासमोर मांडण्यात आली. या विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, प्रखर हिंदुत्ववादी नेते प्रशांत (नाना) सातव यांनीही या प्रकरणात कठोर आणि तातडीची कारवाई करण्याची मागणी करत “बारामतीतील जनतेच्या भावना प्रशासनाने दुर्लक्षित करू नयेत,” अशी भूमिका मांडली. “कऱ्हा नदी वाचवा, बारामती वाचवा,” अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )

