वर्ग ‘ब’ आणि ‘क’ भरतीत मुलाखत बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
बारामती/संपादक-(विकी आगम)
राज्यातील सरकारी नोकरीच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल करत वर्ग ‘ब’ आणि ‘क’ पदांसाठीची मुलाखत (इंटरव्ह्यू) पूर्णपणे बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि गुणवत्ताधारित होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. यानुसार आता उमेदवारांची निवड केवळ लेखी परीक्षेच्या आधारे केली जाणार असून, मुलाखतीमुळे निर्माण होणारा पक्षपात व भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. विशेषतः ग्रामीण व सर्वसामान्य पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. या नव्या धोरणानुसार वर्ग ‘ब’ आणि ‘क’ पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत केली जाणार आहे. भरती प्रक्रियेत एकसमानता आणण्यासोबतच उमेदवारांवरील मानसिक व आर्थिक ताण कमी करण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान, काही विशिष्ट पदांसाठी (जसे शिक्षक, पोलीस भरती) सध्याची पद्धत कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवीन नियमांची सविस्तर जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार असून, सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियांवर या निर्णयाचा परिणाम होणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षार्थींना दिलासा मिळाला असून, “गुणवत्तेला प्राधान्य” देणाऱ्या या बदलाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




