क्राईमताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

गिरीराज नर्सिंग कॉलेज हॉस्टेलवर प्रश्नचिन्ह; अल्पवयीन विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर प्राध्यापकासह दोघांवर POCSO गुन्हा दाखल


बारामती/संपादक-(विकी आगम)
 बारामती शहरातील गिरीराज नर्सिंग कॉलेज हॉस्टेल येथील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून प्राध्यापक व शिपाई विरोधात POCSO कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बारामतीतील शिक्षण संस्था आणि विशेषतः हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, अंनंतकुमार केशव मखमले (सध्याचा पत्ता – समर्थ नगर, बारामती) आणि नितीन प्रभू मोरे (रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नोंदीनुसार, संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनी ही बारामती येथील गिरीराज नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून हॉस्टेलमध्ये वास्तव्यास आहे. तक्रारीनुसार, ऑक्टोबर २०२५ पासून आरोपी प्राध्यापकाने ओळखीचा गैरफायदा घेत वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीमध्ये व्हॉट्सअॅपवर संदेश पाठविणे, महाविद्यालय परिसर तसेच हॉस्टेल परिसरात पाठलाग करणे, मोबाईलवरून संपर्क साधणे, धमकावणे आणि अश्लील वर्तन केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या घटनेनंतर गिरीराज नर्सिंग कॉलेज हॉस्टेलमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण देणे ही शिक्षण संस्था आणि हॉस्टेल प्रशासनाची जबाबदारी असते. तक्रारीनुसार, विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांनी या प्रकरणाची माहिती महाविद्यालय व्यवस्थापनाला दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र तक्रारीची दखल घेऊन तातडीने कोणती पावले उचलण्यात आली? विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या? याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नाते हे विश्वासावर आधारित असते. त्यामुळे शिक्षण संस्थेतील जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. तसेच या प्रकरणात दुसरे आरोपी नितीन प्रभू मोरे यांनी मदत केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. गिरीराज नर्सिंग कॉलेज हॉस्टेल प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पालक आणि नागरिकांकडून हा सवाल उपस्थित केला जात आहे. हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनींसाठी सुरक्षा व्यवस्था, तक्रार निवारण यंत्रणा आणि प्रशासनाचा तत्काळ प्रतिसाद याबाबत अधिक प्रभावी व्यवस्था असणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात POCSO कायदा तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींविरोधात BNS कलम ७४, ३५१(२), ३५१(३), ३(५) तसेच POCSO Act कलम ८ व १२ अंतर्गत तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बारामती शहर पोलीस करीत असून, तक्रारीतील आरोपांची चौकशी करून कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे. बारामतीतील इतर कोणत्याही शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थिनींना अशा प्रकारचा त्रास होत असल्यास त्यांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. शिक्षणाच्या ठिकाणी सुरक्षितता हीच सर्वात मोठी जबाबदारी; गिरीराज नर्सिंग कॉलेज हॉस्टेल प्रकरणातून शिक्षण संस्था आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *