क्राईममहत्त्वाचेशहरसामाजिक

गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी बारामती तालुका पोलिसांचा पंचसूत्री कार्यक्रम


बारामती/संपादक-(विकी आगम)
बारामती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या पुढाकारातून बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालमत्तेविषयीचे गुन्हे, शरीराविरुद्धचे गुन्हे, महिला अत्याचार तसेच अवैध धंद्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमांतर्गत सर्वप्रथम गावागावात तंटामुक्ती समिती कार्यान्वित करण्यात येणार आहे. शेतीचे वाद, बांध, रस्ते तसेच इतर कारणांवरून निर्माण होणारे वाद अनेकदा गंभीर स्वरूप धारण करतात. अशा तंट्यांचे निराकरण गावपातळीवरच करून शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गावातील तंटे गावातच सोडवून सामाजिक सलोखा राखण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून मालमत्तेविषयीचे गुन्हे आणि अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. या यंत्रणेद्वारे गावातील नागरिकांच्या मोबाईलवर एकाच वेळी कॉल दिल्यानंतर संदेश पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार असून त्याद्वारे गुन्हे प्रतिबंध, सतर्कता आणि जनसहभाग वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. गावांमध्ये तसेच महत्त्वाच्या ठिकाणी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच आणि ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे गावात घडणाऱ्या घटनांची माहिती मिळण्यास तसेच गुन्ह्यांची उकल करण्यास मोठी मदत होणार आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रत्येक गावात महिला सुरक्षा समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समित्यांच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर लक्ष ठेवले जाणार असून अशा गुन्ह्यांना वेळीच आळा घालण्यासाठी मदत होणार आहे. याशिवाय सर्व गावांमध्ये तसेच शाळांमध्ये बैठका घेऊन कायदेविषयक, सामाजिक आणि सुरक्षा विषयक जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून सुरक्षित समाज निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे. कोणत्याही गावात दारू, जुगार किंवा इतर प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर व कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिला आहे. गुन्हेगारी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच नागरिकांच्या सहभागातून सुरक्षित आणि गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करणे हा या पंचसूत्री कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी स्पष्ट केले.

 

 


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *