कायद्याची ओळख, सुरक्षिततेची शिकवण; बारामती पोलिसांचा स्तुत्य उपक्रम
बारामती/संपादक-(विकी आगम)
विद्यार्थ्यांच्या मनातील पोलिसांविषयीचा धाक दूर करून त्यांच्यात कायद्याविषयी आदर, सामाजिक जबाबदारी आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये विशेष शैक्षणिक व जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जनहित प्रतिष्ठान प्राथमिक विद्यालयातील १०५ विद्यार्थी व १० शिक्षकांनी या उपक्रमात सहभाग घेत पोलीस विभागाचे कामकाज प्रत्यक्ष जाणून घेतले.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना तक्रार कक्ष, पासपोर्ट पडताळणी विभाग, गोपनीय शाखा, मुद्देमाल कक्ष, लॉकअप रूम, चरित्र पडताळणी विभाग, तपास पथक, सीसीटीएनएस प्रणाली, स्टेशन डायरी तसेच नागरिक सेवा विभागाच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. नागरिकांच्या तक्रारी कशा स्वीकारल्या जातात, गुन्ह्यांची नोंद कशी केली जाते, तपास प्रक्रिया कशी राबविली जाते आणि नागरिकांना विविध सेवा कशा उपलब्ध करून दिल्या जातात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना ‘गुड टच-बॅड टच’, सायबर सुरक्षा, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, वाहतूक नियम, व्यसनमुक्ती, व्यक्तिमत्त्व विकास तसेच संविधानिक अधिकार आणि कर्तव्यांबाबत माहिती देण्यात आली. तंबाखू, गुटखा, सिगारेट व इतर व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगत विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
वाहतूक सुरक्षेअंतर्गत रस्ता सुरक्षितपणे ओलांडणे, झेब्रा क्रॉसिंगचा वापर, हेल्मेट आणि सीट बेल्टचे महत्त्व तसेच अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ओटीपी फसवणूक, फेक लिंक, बनावट वेबसाईट आणि ऑनलाइन आर्थिक फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना पोलीस विभागाकडे उपलब्ध असलेल्या विविध शस्त्रांची माहिती देण्यात आली. तसेच कायद्याचे पालन, जबाबदार नागरिकत्व आणि समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारले. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करत पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक घट्ट करण्याचा संदेश दिला.
बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणारा आणि पोलीस-नागरिक संबंध अधिक बळकट करणारा ठरला.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




