क्राईमताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

पोलीस चौकीची झाली चोरी? शहर वाढलं पण पोलीस व्यवस्था कमी पडली!


बारामती/संपादक-(विकी आगम)                                  बारामती शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना आणि लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना शहरातील पोलीस व्यवस्थेवर मात्र गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील बाबूजी नाईक वाडा येथील जुने पोलीस स्टेशन काही वर्षांपूर्वी रिंग रोड परिसरात स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर शहरातील बाजारपेठ आणि मध्यवर्ती भागातील सुरक्षा अबाधित राहावी म्हणून त्या ठिकाणी पोलीस चौकी सुरू करण्यात आली होती. मात्र ही चौकी काही दिवस सुरू राहिली आणि नंतर पूर्णपणे बंद पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी चौकी करण्यात आली होती, त्या ठिकाणी आता प्रत्यक्षात पोलीस चौकी अस्तित्वात असल्याचेही दिसत नाही. फक्त बाबूजी नाईक वाडा येथील चौकीच नव्हे, तर टीसी कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेली चौकी आणि शहरातील अतिवर्दळीच्या भाजी मंडई परिसरातील चौकीही निष्क्रिय झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. शहरातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील भागांमधील चौक्याच बंद पडत असतील तर शहराची सुरक्षा नेमकी कोणाच्या भरोशावर चालली आहे, असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. दरम्यान, बारामती शहरातील वाहतूक व्यवस्थेचाही प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वाहनांची झपाट्याने वाढणारी संख्या, मुख्य रस्त्यांवरील वाढती गर्दी, वारंवार होणारे अपघात आणि त्यानंतर निर्माण होणारे ट्रॅफिक जॅम यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकदा वाहतूक कोंडीच्या ठिकाणी पोलीस वेळेत पोहोचत नसल्याने परिस्थिती आणखी चिघळत असल्याची चर्चा आहे. त्यातून वाहनचालकांमध्ये वाद निर्माण होण्याचे प्रकारही वाढत असल्याचे बोलले जात आहे. पूर्वी शहरात पोलिसांची नियमित गस्त आणि उपस्थिती असल्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारचा धाक आणि शिस्त होती. बाजारपेठ, चौक आणि गर्दीच्या भागांमध्ये पोलिसांचा सतत वावर असल्याने अनेक अनुचित प्रकारांना आळा बसत होता. मात्र आता शहराच्या मध्यवर्ती भागातून पोलिसांचा वावर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची भावना व्यापारी आणि नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांत बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर नवीन निवासी परिसर, व्यापारी संकुले आणि व्यवसायिक भाग उभे राहिले आहेत. शहराचा विस्तार वाढत असताना पोलीस विभागाकडे मात्र त्यानुसार पुरेसे अधिकारी आणि कर्मचारी मनुष्यबळ उपलब्ध आहे का, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या शहरासाठी सध्याची पोलीस यंत्रणा अपुरी पडत असल्याची चर्चा आता शहरभर रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, बारामती शहर पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विविध कारवाया आणि प्रशासकीय हालचालींमधून आपल्या कामाचा धडाका दाखवून दिल्याची चर्चा शहरात आहे. अनेक प्रकरणांमध्ये तत्परता दाखवत त्यांनी पोलीस प्रशासन अधिक सक्रिय करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचेही बोलले जात आहे. मात्र शहरातील बंद पडलेल्या पोलीस चौक्या, वाढती वाहतूक कोंडी, बाजारपेठेतील घटलेला पोलिसांचा वावर आणि वाढत्या शहरासमोरील कायदा-सुव्यवस्थेच्या आव्हानांवर ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे आता बारामतीकरांचे लक्ष लागले आहे. शहर वाढत असताना पोलीस चौक्या बंद पडणे, पोलिसांचा वावर कमी होणे आणि वाहतूक तसेच कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर होत जाणे ही परिस्थिती भविष्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे बंद पडलेल्या चौक्या पुन्हा सुरू करून शहराच्या मध्यवर्ती भागात आणि गर्दीच्या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस उपस्थिती वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *