आरोग्यक्राईमताज्या घडामोडीमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहरसामाजिक

बारामतीतील शासकीय कत्तलखाना वादाच्या भोवऱ्यात; बेकायदेशीर कत्तलीचे गंभीर आरोप


बारामती/संपादक-(विकी आगम)
शहरातील शासकीय अधिकृत ‘म्हैस वर्गीय’ कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि बेकायदेशीर कत्तल सुरू असल्याचा गंभीर आरोप करत मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर राजेंद्र स्वामी, हिंदुत्ववादी प्रखर नेते प्रशांत नाना सातव, Adv. माने, Adv. विराज आवधूते व गोरक्षक यांनी बारामती नगरपरिषद मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित कत्तलखाना तात्काळ बंद, सील अथवा उध्वस्त करून कठोर कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

मुख्याधिकारी पंकज भुसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर कत्तलखान्यास मर्यादित प्रमाणात म्हैस वर्गीय जनावरांच्या कत्तलीची परवानगी असताना प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जात असल्याचा आरोप आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह इतर आवश्यक विभागांची वैध परवानगी नसल्याचाही दावा करण्यात आला आहे.

निवेदनात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चा उल्लेख करत, शेतीसाठी उपयुक्त जनावरांचीही बेकायदेशीर कत्तल होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे कायद्याचे थेट उल्लंघन होत असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे, सदर कत्तलखान्यामध्ये दररोज कापल्या जाणाऱ्या जनावरांची संख्या, त्यांची अधिकृत नोंद, वैद्यकीय तपासणी, वाहतूक नोंदी तसेच कत्तल केलेल्या जनावरांचा कोणताही अधिकृत रेकॉर्ड बारामती नगरपरिषद अथवा संबंधित विभागाकडे उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यावरून सदर कत्तलखान्याचा कारभार पूर्णपणे अनियमित व बेकायदेशीर पद्धतीने सुरू असल्याचे स्पष्ट होत असल्याचे स्वामी व सातव यांनी निवेदनात म्हटले आहे.

याशिवाय, कत्तल केलेल्या जनावरांचे रक्त, सांडपाणी व इतर जैविक घातक कचरा शेजारील नदीमध्ये थेट सोडला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. दुर्गंधी, अस्वच्छता, जलप्रदूषण तसेच संसर्गजन्य रोगांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाची दखल घेत संबंधित कत्तलखान्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि DYSP यांच्याकडेही करण्यात आली आहे.


सत्य नामा

                                           मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम                             उपसंपादक-( विवेक साळुंके ) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *