संमेलनात राष्ट्रहिताचा विचार; एकतेतून शक्तीचा संदेश
बारामती/संपादक-(विकी आगम)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त भरलेल्या हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा प्रखर नारा घुमला. प्रख्यात इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “राष्ट्र आणि संविधान वाचवायचे असेल तर हिंदूंनी आता एकदिलाने उभे राहिले पाहिजे.”
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज हातात घेऊन संघटित होण्याचे त्यांनी ठाम आवाहन केले. कार्यक्रमात संत बाळूमामा चरित्र कथाकार मेजर वासुंदेकर महाराज यांनी परदेशात हिंदू धर्माची वाढती स्वीकारार्हता अधोरेखित करत, “आपणच आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहोत,” अशी खंत व्यक्त केली. प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या जागृती अयाचित यांनी मातृशक्तीच्या बलिदानाची जाणीव करून देत, कुटुंबातूनच संस्कारांची सुरुवात व्हावी असे ठणकावले. यावेळी अभय ठकार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत संघटनशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. दरम्यान, धवलसिंह मोहिते पाटील यांनी तीव्र शब्दांत समाजाला सज्ज राहण्याचे आवाहन करत विविध सामाजिक मुद्द्यांवर थेट भाष्य केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हिंदू बांधवांची उपस्थिती होती. प्रास्ताविक दिलीप शिंदे यांनी केले, तर आभार भानुदास बापू हिंगणे यांनी मानले. पसायदान आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




