विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; अभाविप आक्रमक, विद्यानगरीत CCTV लावण्याची जोरदार मागणी
बारामती/संपादक-(विकी आगम)
बारामतीतील विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी परिसरात वाढत्या विद्यार्थ्यांच्या वर्दळीमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आक्रमक भूमिका घेत पुढे सरसावली आहे. कॅम्पसलगत असलेल्या रस्त्यावर तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची ठाम मागणी अभाविपतर्फे करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांची वाढती गर्दी, वाहतुकीचा वाढता ताण आणि विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने सध्या कोणतीही ठोस यंत्रणा नसल्याने परिसर असुरक्षित बनत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी CCTV व्यवस्था अत्यावश्यक असल्याचे अभाविपने स्पष्ट केले.या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सचिन सातव तसेच नगर परिषदेचे मुख्य अधिकारी पंकज भुसे यांना निवेदन देत तात्काळ कार्यवाहीची मागणी करण्यात आली. 
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नगराध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित CCTV बसवण्याच्या सूचना दिल्याने प्रशासन हलल्याचे चित्र आहे.या वेळी अभाविपचे जिल्हा संयोजक अभिषेक भापकर, जिल्हा सहसंयोजक ओंकार तावरे, शहर मंत्री स्वप्नील गावडे, शहर संपर्क प्रमुख पारस हवलदार तसेच प्रतिक ननावरे, ओम परकाळे, आदित्य ननावरे, हर्षवर्धन शेळके आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अभाविपच्या या आक्रमक भूमिकेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, आता प्रशासन नेमकी कितपत आणि किती जलद कार्यवाही करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




